#श्री_संत_शिरोमणी_नरहरी_ सोनार महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

 *श्री संत नरहरी महाराज सोनार,  पुण्यतिथी - २०२३.* 

      आज श्री संत नरहरी  यांची   पु


ण्यतिथी. महाराष्ट्राला‌ फार मोठी संत परंपरा लाभली , त्या संत परंपरेतील हे एक थोर संत.   

     संत नरहरी सोनार यांचा *जन्म शके १११५ मध्ये पंढरपूर* येथे सोनार समाजात झाला.  त्यांच्या जन्माच्या वेळेस १४०० वर्षांचे आयुष्य लाभलेले *श्री चांगदेव महाराज* पंढरपुरात उपस्थित होते.  आणि त्यांनीच श्री नरहरी महाराजांचे  नामकरण केले असा उल्लेख आढळतो. त्याचप्रमाणे पुढे नाथ परंपरेतील *श्री गहनिनाथ महाराज,*  यांनी त्यांना दीक्षा दिली असा ही उल्लेख आढळतो.  *संत कोणत्या समाजातील आहेत, हा मुद्दा कधीच महत्त्वाचा नसतो,* तर त्यांनी सर्व समाजासाठी कोणते महत्त्वाचे कार्य केले, त्यांनी सर्व समाजाला कोणती शिकवण दिली, हे महत्त्वाचे असते.   संतांनी सांगितलेले अध्यात्मिक तत्त्वज्ञान हे सर्व समाजांतील ल़ोकाना उपयुक्त ठरते.  संतांनी सर्व मानव जातीला शांतीचा व सात्त्विक जीवनाचा मार्ग दाखविला,  तसेच सर्व मानव कल्याणासाठी, जगण्याचं गमक कशात आहे हे  दाखवून दिले.  श्री संत नरहरी महाराज,  यांच्या पित्याचे नाव *अच्युतबाबा व* आई चे नाव *सावित्रीबाई* असे होते.

       श्री संत नरहरी सोनार हे पंढरपूरात सोनारकीचा व्यवसाय करीत.   ते एक उत्तम कारागीर होते, त्यामुळे त्यांचे नाव त्या काळात एक उत्तम, प्रतिष्ठित व विश्वासू कारागीर म्हणून प्रसिद्ध होते.  यामुळे, श्री विठ्ठलासाठी लागणारे सर्व दागिने  त्यांच्या हातून बनविले जात. लोक त्यांना *देवाचा सोनार* असे म्हणत. 

      

      संत नरहरी सोनार हे मूळात  *कट्टर शिवभक्त.*  त्यांनी शिवभक्ती शिवाय इतर कुठल्याच देवाची भक्ती केली नाही.    आणि, त्या वेळच्या शैव प्रथेनुसार त्यांनी विठ्ठल दर्शन कधी घेतले‌ नाही.   विठ्ठल मंदिरा समोरील मल्लिकार्जुन  मंदिराजवळ ते रहात असत.  रोज नियमित महादेवाचे दर्शन घेत, स्वतःचा नित्य व्यवसाय करता करता शिव नामात तल्लीन असत.  त्यांच्या समोर कुणी विठ्ठलाचे नाव उच्चारले तरी त्यांना ते आवडत नसे, इतके ते कट्टर शिवभक्त होते.  त्या वेळी त्यांची अध्यात्मिक ज्ञान साधना येवढी पूर्णत्वाला गेलेली नव्हती.

त्याची ज्ञान साधना पूर्णत्वाला जाण्यासाठी एक महत्त्वाचा प्रसंग कारणीभूत ठरला, जेणेकरून त्यांच्या मनातील *हरी - हर* भेद पूर्णपणें नष्ट झाला.  आणि त्यांचे पूर्ण आयुष्य पूर्ण बदलून गेले,  आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली,  आणि उर्वरित आयुष्य त्यांनी विठ्ठल भक्तीत घालवले.  या करिता कुठला प्रसंग कारणीभूत ठरला, त्या प्रसंगाचा उल्लेख करणे हे फार महत्त्वाचे आहे.

      एकदा एक दिवस एक विठ्ठल भक्त , सावकार, विठ्ठलाचा नवस  फेडण्यासाठी पंढरपुरी दाखल झाले होते.  त्यांना विठ्ठल कृपेने पूत्ररत्न प्राप्त झाले होते. त्यांनी केलेल्या नवसाप्रमाणे त्यांना चांदी चा रत्नजडित कडदोरा विठ्ठलाचे कमरेत घालण्यासाठी तयार करून घ्यावयाचा होता. त्यांना एका चांगल्या निष्णात सोनार कारागिराची आवश्यकता होती.  चौकशी अंती त्यांना नरहरी सोनार,  यांचे नाव समजले. त्यामुळे ते सद्गृहस्थ नरहरी सोनार यांचेकडे आले.  त्यांनी  नरहरी सोनार यांना,  विठ्ठलाच्या कमरेच्या मापाचा रत्नजडित, सोन्याचा कडदोरा बनविण्याची विनंती केली.  

      परंतु, नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त असल्यामुळे ते विठ्ठलाच्या कमरेचे माप मी घेणार नाही ,  हे त्यांनी आधीच स्पष्ट केले.  त्या ऐवजी त्यांनी त्या सवकारालाच,  विठ्ठलाचे कमरेचे माप आणून देण्यास सांगितले.  त्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी त्या गृहस्थाने विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले.   नरहरी सोनारानी त्यांच्या उत्तम कारागिरीने,  एक उत्तम रत्नजडित कडदोरा बनवून त्या गृहस्थांना दिला.  बनविलेला  कडदोरा पाहून ते गृहस्थ अतिशय  आनदीत झाले.  त्यांना त्यांच्या मनासारखा दागिना बनऊन मिळाला होता.

      दुसऱ्या दिवशी ते गृहस्थ विठ्ठल मंदिरात गेले आणि त्यांनी तो विठ्ठलाच्या कमरेत कडदोरा घातला, त्यांना तो कडदोरा चार बोटे वाढीचा झाल्याचे लक्षात आले,  ते पाहून त्या गृहस्थाने नरहरी सोनार यांचे कडे येऊन कडदोर चार बोटे वाढीचा झाल्याचे सांगितले, आणि तो चार बोटे कमी करण्याची विनंती केली.  त्या प्रमाणे नरहरी सोनारानी ती बनऊन दिली.  ते गृहस्थ मंदिरात गेले आणि पांडुरंगाला तो दागिना घातला, तर काय आश्चर्य , तो दागिना चार बोटे मोठा झाला होता.  आता मात्र त्या गृहस्थाना कांहीं सुचेना.  असे का होत आहे, याचा काही अंदाज येईना.  आता मात्र ते गृहस्थ नरहरी सोनाराना खूपच विनंती करू लागले की, आपणच प्रत्यक्ष पांडुरंगाच्या कमरेचे माप घ्यावे.   नरहरी सोनाराना पण समजेना,  हे असे कसे होत आहे.  शेवटी त्यांनी त्या गृहस्थाची विनंती मान्य केली, परंतु डोळ्यावर पट्टी बांधूनच पांडुरंगाच्या कमरेचे माप घ्यावयाचे ठरले.   ठरल्याप्रमाणे नरहरी सोनारानी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधूनच पांडुरंगाच्या कमरेचे माप घेण्यासाठी विठ्ठल मंदिरात दाखल झाले.   हे पाहून सगळे लोक हा काय प्रकार आहे,  याची चर्चा करू लागले.  नरहरी सोनार हे डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठलाच्या कमरेचे माप घेऊ लागले. जेव्हां त्यांनी विठ्ठलाच्या कमरेला हात लावला तर त्यांना तो महादेवाच्या पिंडीसारखा आकार वाटला,. आपण महादेवाच्या मंदिरात आलो आहोत काय असा भास त्यांना झाला.  परत एकदा त्यांनी कमरेच्या मापाचा अंदाज घ्यावा म्हणून हात पुढे केला,  तर त्यांना तो व्याघ्रचर्म असल्याचा भास झाला.   शेवटी त्यांनी विठ्ठलाच्या गळ्यास हात लावला तर तो त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचा भास झाला.   या विचित्र अनुभवामुळे,. नरहरी सोनाराना आपण विठ्ठल मंदिरात नसून महादेवाचे मंदीरातच आलो आहोत,  असे वाटू लागले.  शेवटी खात्री करून घ्यावी म्हणून त्यांनी आपल्या डोळ्या वरची पट्टी काढली, तर समोर विठ्ठलाची प्रसन्न अशी मूर्ती दिसली.  ते पाहून त्यांनी डोळ्यावर परत पट्टी बांधली  आणि कमरेचे माप घेऊ लागले तर पुन्हा तोच अनुभव आला.  ते गोंधळून गेले. शेवटी त्यांनी आपल्या डोळ्यावरची पट्टी काढली आणि ते विठ्ठलाला शरण आले.  त्यांनी विठ्ठलाचे पाय धरले  आणि क्षमा मागितली.  त्यांच्या मनातील  हरी - हर भेद पूर्णतः नाहीसा झाला होता. त्यांना त्यांच्या या वागणुकीचा पश्र्चाताप वाटू लागला.  

      शेवटी त्यांनी बनविलेला कडदोरा विठ्ठलाच्या कमरेत घालून पहिला,  तर तो अगदी बरोबर मापाचा झाला होता.  हा सर्व प्रकार मंदिरात उपस्थित लोक कौतुकाने पहात होते.  शेवटी नरहरी सोनार यांनी त्यांचे पुढील आयुष्य हरी भक्तीत घालविले. 

       पुढे ते पांडुरंगाच्या भक्तीत येवढे लीन झाले की, त्यांचा प्रत्येक क्षण,  पांडुरंग नामात जाऊ लागला.   पांडुरंग ही नरहरी महाराजाना त्यांच्या कामात मदत करीत.  म्हणजे ते पांडुरंगासी एकरूप झाले होते.   ही भक्ती करता करता त्यांनी कांहीं अभंगाची रचना केली.  त्यांनी एकूण किती अभंगाची रचना केली, हे निश्चितपणे सांगता येणार नाही, परंतु त्यांचे ३४ अभंग हे प्रसिद्ध आहेत.

      याच बरोबर त्यांनी *दुर्गा देवीची आरती, *दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी* .....ही आरती रचली, ती खूपच प्रसिद्ध आणि सर्वश्रृत आहे.

      येथे आपण संत नरहरी महाराजांच्या दोन अभंगाचे निरूपण पाहू


 *अभंग ११ वा.* 


 *उठ बा होते जागा पहा वासुदेवाला ‌।* 

 *सुदिन उगवला दान आपुले घाला।। १।।* 

 *आणिक हिता गा आला अवचित फेरा ।* 

 *हे घरी सापडेना काही दान पुण्य* *करा ।।2।।* 

 *ठेविल्या स्थिर नोहे घर सुकृते भर ।* 

 *भक्तिसी भर नाही संत संगती वर ।।३।।* 

 *संसार सार नोहे माया मृगजल भास ।* 

 *क्षणात भ्रांती याचा काय विश्वास ।। ४।।* 

 *घे करी टाळ दिंडी होय विठ्ठलाचा दास ।* 

 *सावधान नरहरी झालो चरणी निजध्यास ।।५।।* 

    

       संत नरहरी महाराज म्हणतात, अरे माणसा उठ,  जागा हो,  आणि पहा त्या वासुदेवाला, त्याचे दर्शन घे.   हे ज्या दिवशी तुला सुचेल तो दिवस तुझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा सुदिन असेल.   हे  जेव्हा घडेल, तेव्हा तुझ्या आयुष्यात चांगले दिवस आले असे समज.  त्या करिता तुझ्या जवळ जे काही चैतन्य आहे , त्याची तू जाण ठेव आणि ते तू त्या वासुदेवाला अर्पण कर.   अशा या चैतन्याला भक्तीत भरुन रममाण हो, लीन हो.  एकदा का काळाचा फेरा आला की, तुला भक्ती करायला आणि काही दान पुण्य करावे म्हटले वेळ ही मिळणार नाही.  म्हणुन हे मनुष्या, आताची जी वेळ,  संधी आहे ती दवडू नको, आताच दान,  पुण्य कर.  तुझे घर,  तुझा देह स्थिर नाही.  त्यांच्या वर काळाचा कधी घाला पडेल, यांचा नेम नाही.  म्हणून तुझा हा देह सुकृताने , भक्तीने भरुन टाक. भक्तीला कसलीही भिती नाही,  संत संगती  धर.  तुझा हा प्रपंच संसार, हे जीवनाचे खरे सार नाही , हे सगळे मिथ्या आहे, व्यर्थ  आहे. माया, मोह हे, मृगजळा समान आहेत.   म्हणून त्यात अडकून पडू नकोस.  क्षणात भ्रांती होऊन, काळाचा घाला पडेल न पडेल याचा काय विश्वास.  म्हणून यातून तू बाहेर पडून,  हातात टाळ घेऊन दिंडीत सहभागी हो.  भगवंताचे नामस्मरण कर आणि त्या विठ्ठलाचा दास हो. म्हणजे तुझ्या जीवनाचे सार्थक होईल.  नरहरी महाराज म्हणतात, याच सावधानते मुळे मी हरी च्या चारणाचा नीजध्यास घेतला आणि त्या हरीचा दास झालो.


 *अभंग १२ वा* 


 *नाम फुकाचे फुकाचे । देवा पंढरीराया चे ।।१।।* 

 *नाम अमृत हे  सारं ।  हृदयी जपा निरंतर ।।२।।* 

 *नाम संतांचे माहेर । प्रेम सुखाचे आगर ।।३।।* 

 *नाम सर्वांमध्ये सारं । नरहरी जपे निरंतर ।।४।।*


      संत नरहरी महाराज आपल्या  वरील अभंगात नामस्मरणाचे महत्त्व सांगताना म्हणतात.  अरे बाबांनो, पांडुरंगाचे नाम फुकट आहे, ते घ्यायला कसल्याही प्रकारचे मोल द्यावे लागत नाही.  आपले सर्व व्यवहार, काम करताना, उठता बसता, चालता बोलता होईल तेवढे नाम घ्यावयाचे आहे.  जसे अमृत प्याल्याने संजीवनी प्राप्त होते, त्याच प्रमाणे,  नामाचे अमृत प्याल्याने अध्यात्मिक संजीवनी प्राप्त होते, आणि आपण हे भवसागर लीलया तरून जाऊ शकतो.  म्हणून भगवंत नामाला निरंतर हृदयात जपा.  

      नाम हे अमृत आहे.  म्हणून सर्व संतांनी नामाचा आश्रय घेतला.  नाम हे संतांचे माहेर आहे.  ज्याप्रमाणे मुलगी माहेरी आल्यावर तिला जसी सर्व सुखे विनासायास मिळतात त्याच प्रमाणे,  हे माहेरचे सुख,  म्हणजे संसार सागर तरुन जाण्याचे सुख,   संताना भगवंत नामाच्या चिंतनातून मिळवायचं आहे.  म्हणून  नाम हे ,  सर्व सुखांचे सार आहे.   संत नरहरी महाराज म्हणतात,  मी या भगवंत नामाचा जप,  निरंतर जपत असतो.

       सर्व समाज बांधवांना विनंती आहे की,  आपण त्यांच्या *जय नरहरी* या नामाचे उत्सवापुराते स्मरण न ठेवता,  आपण सारे त्या पांडुरंगाच्या चरणी लीन होऊ या.  त्या पांडुरंग नामाचा निरंतर जप करू या.  म्हणजे खऱ्या अर्थाने त्या नरहरी महाराजांची  पुण्यतिथी साजरी केल्याचे समाधान लाभेल.


 *जय नरहरी ! जय नरहरी ! ! जय नरहरी !!!* 


               *विनायक कव्हेकर* 

                       सोलापूर

Popular posts from this blog

फलटणवासीयांकडून पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांचा भव्य जाहीर नागरी सत्कार संपन्न

श्री गोविंद प्रभु अवतार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा